अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही जीवनदान” हा मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारे अवयवदाते व त्यांचे कुटुंबिय तसेच ज्यांना ते अवयव मिळाले त्या रुग्णांचा जागतिक अवयवदान दिनानिमित्त नाईन पर्ल्स हॉस्पिटलतर्फे सन्मान करण्यात आला. दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करणेआणि अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे, मृत दाते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकचे अधिष्ठाता डॉ. संदीप गुंडरे उपस्थित होते. त्यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अवयवदान चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे संचालक तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. नागेश अघोर यांनी अवयवदान दिनाचे महत्त्व, अवयवदानाची वैद्यकीय प्रक्रिया, कायदेशीर नियमावली तसेच समाजातील गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. असे आवाहन त्यांनी केले.
अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून या जीवनसंजीवनी चळवळीत सहभागी व्हावे. –नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे संचालक तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. नागेश अघोर
दोन कुटुंबांनी दाखविला मानवतेचा आदर्श
कार्यक्रमात दिवंगत डॉ. विजयालक्ष्मी विनायक खैरे (वय ५३) यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. मे महिन्यात नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये त्यांचे ब्रेन-स्टेम डेथ झाल्यानंतर त्यांचे पती डॉ. विनायक खैरे आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वतःहून पुढाकार घेत अवयवदानाचा निर्णय घेतला.खैरे यांच्या दोन किडनी आणि यकृत, डोळे दान करण्यात आले. झेडटीसीसी पुणे यांच्या अवयव वाटप प्रक्रियेनुसार एक किडनी नाशिक येथील नाईन पर्ल्स हॉस्पिटलमधील गरजू रुग्णाला, तर दुसरी किडनी पुणे येथील डी. वाय. पाटील, पुणे रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. यकृताचेही मेडीकव्हर पुणे येथील रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले. खैरे कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगी घेतलेल्या या निर्णयातून समाजापुढे मानवतेचा आदर्श निर्माण केला.
भारतीय अवयवदान दिनाच्या पूर्वसंध्येला, ३ ऑगस्ट रोजी कारसेवक असलेले ५६ वर्षीय कै.कैलास उत्तम चौधरी यांच्या कुटुंबीयांनीही अपघातामध्ये मेंदू मृत झालेल्या कैलासजीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नी, मुलगा, ३ बहिणींनी अत्यंत संवेदनशील निर्णय घेत त्यांच्या दोन किडनी व यकृताचे दान केले. झेडटीसीसी पुणे यांच्या वाटप प्रक्रियेनुसार एक किडनी नाशिक येथील नाईन पर्ल्स हॉस्पिटलमधील रुग्णाला, तर दुसरी किडनी आणि यकृत पुणे येथील के.ई.एम. रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले. चौधरी कुटुंबीयांच्या या निर्णयाचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
जिवंतपणी किडनी दान करणाऱ्या दात्यांचाही गौरव
कार्यक्रमात जिवंतपणी आपल्या नातेवाईकांना किडनी दान करणाऱ्या दात्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रा. शालिनी मनोज पेखळे यांनी विरुद्ध रक्तगट असतानाही आपल्या पतीला किडनी दान केली.. रामकृष्ण सुखदेव जगताप यांनी आपल्या भाच्याला, मंदाबाई लहानू गांगुर्डे यांनी आपल्या मुलाला, तर रवींद्र बालाजी भांगरे यांनीही आपल्या मुलाला किडनी दान केली.
याशिवाय ब्रेन-स्टेम डेथ झालेल्या पुणे येथील रुग्णाकडून किडनी मिळालेल्या उस्मानाबाद येथील रणजित सुब्राव मुळे, कांचन शरद गोरडे आणि प्रशांत हेमंत जोशी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
किडनी प्रत्यारोपणाचा अनुभव अत्यंत समाधानकारक
किडनी प्रत्यारोपणाचा लाभ घेतलेले प्रा. मनोज पेखळे यांनी नाईन पर्ल्स हॉस्पिटलमधील उपचार व प्रत्यारोपणाचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी हॉस्पिटलचे संचालक तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. नागेश अघोर तसेच संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
अवयवदानाचा संकल्प हा केवळ एका व्यक्तीचा निर्णय नसून संपूर्ण समाजाला जीवन देणाऱ्या मानवतावादी चळवळीचा भाग आहे. अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा. – डॉ. राजेंद्र देशमुख ( नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे संचालक तथा कार्डिओलॉजिस्ट)
कार्यक्रमास डॉ. शीतलकुमार हिरण, डॉ. दिनेश वाघ, डॉ. धनंजय दुबेरकर, डॉ. हुसेन बोहरी, डॉ. योगेश चौधरी, डॉ. विनायक शेंडगे, डॉ. सचिनकुमार पाटील, न्यूरोसर्जन डॉ. भूषण उभाळे, लिव्हर प्रत्यारोपण सर्जन डॉ. मनोज भांबरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्षमा नागेश अघोर, डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे प्रत्यारोपण समन्वयक अमोल दुगजे, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
अवयवदान : एका निर्णयातून अनेकांना नवे जीवन
अवयवदानामुळे मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीचे अस्तित्व दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकते. हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे यांसह वैद्यकीय निकषांनुसार विविध अवयव व ऊती प्रत्यारोपणासाठी उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे अवयवदानाबाबत योग्य माहिती घेणे, गैरसमज दूर करणे आणि आपल्या कुटुंबीयांशी अवयवदानाच्या इच्छेबाबत संवाद साधणे गरजेचे आहे.
“आपण गेल्यानंतरही कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनू शकतो; अवयवदान करा आणि मृत्यूनंतरही जीवन देण्याची संधी जपा,” हा संदेश नाईन पर्ल्स हॉस्पिटलमधील या उपक्रमातून देण्यात आला.
